चमकते तेच सोने (अग्रलेख)   

सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. चांदीदेखील दराचे नवे विक्रम नोंदवीत आहे. भारतीयांच्या दृष्टीने हे दोन्ही धातू जिव्हाळ्याचा विषय आणि बचतीसाठीचा सुरक्षित पर्याय. शेअर बाजारातील गुंतवणूक अधिक फायदेशीर असल्याची आर्थिक गुंतवणुकीतील तज्ज्ञांची भूमिका असते. त्याचा परिणाम भारतीयांच्या गुंतवणूक मानसिकतेवर झाला असला तरी सोने खरेदी, सोन्यात  गुंतवणूक, हा कल फार बदलला असे नाही. आता अर्थ विषयातील तज्ज्ञांपेक्षा सर्वसामान्य भारतीय सुजाण ठरले, असे सोन्याच्या दरवाढीमुळे म्हटले तर चुकीचे नाही! सध्या शेअर बाजार उसळलेला आहे; पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाच्या धोरणामुळे भल्या-भल्या आर्थिक विश्‍लेषकांचे अंदाज धुळीला मिळाले. देशादेशांतील मतभेद, भिन्न राजकीय व्यवस्था, देशांतर्गत वेगवेगळे प्रश्‍न, यावर मात करून जगाने आयात-निर्यातीसाठी एक व्यवस्था निर्माण केली. जागतिक व्यापार संघटनेने यासाठी दिग्दर्शन केले. अमेरिकेत ट्रम्प यांचा पुन्हा उदय झाल्यावर बहुतांशी मतैक्य असलेल्या  व्यवस्थेलाच हादरे बसले आहेत. त्यांच्या अतिरेकी भूमिकेमुळे जगभरातील शेअर बाजार घसरणीच्या लाल रंगात बुडाले. यातून अमेरिकेचा बाजारही वाचला नाही, शिवाय डॉलरची घसरण सुरुच आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्याची चकाकी वाढली नसती तरच नवल! ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढीच्या निर्णयाला नव्वद दिवसांसाठी दिलेल्या स्थगितीमुळे शेअर बाजार सावरले. त्यांनी आगेकूच सुरु ठेवली. तरीही सोन्याचे दर लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले, याचे वेगळे अर्थ निघतात. नव्वद दिवसांनंतर ट्रम्प आता कोणता निर्णय घेतील, याबद्दल जगभरात चिंता आहे. त्यांच्या बेभरवशी भूमिकेमुळे डॉलरला पूर्वीसारखी मजबुती येण्याची शक्यता दुरापास्त वाटत आहे. या पार्श्‍वभूमीवर जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असून ही खरेदी लवकर थांबण्याची शक्यता नाही.
 
सुरक्षित पर्याय
 
बँकांकडून होणारी खरेदी आणि केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात केलेली वाढ, याचे स्पष्ट प्रतिबिंब सोन्याच्या दरात पाहायला मिळत आहे. एप्रिल-मे हा लग्नाचा मोसम. भारतीय विवाह सोहळ्यांसाठी होणार्‍या खरेदीमध्ये सोने महत्त्वाचे. प्रचंड दरवाढीमुळे सामान्यांपुढे प्रश्‍न निर्माण झाल्यास आश्‍चर्य नाही. व्यावसायिकांनी खरेदीवर परिणाम होऊ नये यासाठी अठरा कॅरेटच्या दागिन्यांवर भर दिल्याचे सांगण्यात येते. अर्थात हा दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखा प्रकार. वर्ष सुरु झाल्यावर अवघ्या चार महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात तब्बल २६ टक्के वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांच्या गोल्ड ईटीएफ योजनांना देखील आताच्या काळात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सोन्याने २६५ टक्के परतावा दिला. फार अपेक्षा नसलेल्या कंपनीच्या समभागाने शेकड्यात परतावा द्यावा, असेच हे चित्र. २०१५ मध्ये दहा ग्रॅमसाठी सोन्याचा भाव २६ हजार रुपयांच्या आसपास होता. आज तोच भाव लाखाच्या घरात पोहोचला आहे. यामुळे सोन्यात पैसा गुंतविणार्‍यांची चांदी झाली असली तरी जागतिक अर्थव्यवसथेच्या सुस्थितीचे हे लक्षण नाही. साधारणतः मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि दहा ग्रॅम सोन्याचा दर बरोबरीने चालतात. यावेळी शेअर बाजाराच्या निर्देशांकाला सोन्याने चांगलेच मागे टाकले आहे. अमेरिकेतील अनिश्‍चित परिस्थितीमुळे तेथे महागाई वाढण्याची आणि त्यातून खरेदीला खीळ बसून मंदी येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या म्हणण्यासमोर जगाने झुकावे, ही ट्रम्प यांची हास्यास्पद अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही.उलट ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युद्धाच्या जाळ्यात पूर्ण जग लोटले जाण्याची भीती दिसत आहे. चीनने अमेरिकेला खुले आव्हान दिले. कुठल्याही देशाने अमेरिकेबरोबर करार करू नये, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. यामुळे शेअर बाजार आणि अन्य गुंतवणूक साधनांच्या तुलनेत सर्वसामान्यांची पसंती सोने आणि चांदी यांनाच राहणार, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सोन्याचे दर यापुढच्या काळात किती चक्रावून टाकणार एवढाच प्रश्‍न आहे! 

Related Articles